Thursday, February 26, 2015

मुंबई ला कोण वेगळे करणार?

आमच्या ऑफिस मध्ये येणारा बाबू चहावाला मोठा आसामी. त्याचे व्यावहारिक तर्क पण आसाम चहा सारखेच एकदम कड़क. मुळात कोकणातला असल्याने साखरेचा हात सढळ असला तरी जिभेवर गोडवा कमीच. बेताची उंची, गोल वाटोळे शरीर, चहाच्या रंगाशी साधर्म्य सांगणारा ताम्बुस काळपट रंग, कंगव्याची गरज न भासेल इतपतच केशसांभार उरलेला, कपाळावर जमिनीला समांतर जाणाऱ्या २ ठसठशीत मस्तकरेषा आणि नाकाच्या सरळ रेषेत उर्ध्वगामी ओढलेले अष्टागंधाचे बोट. पांढरा शुभ्र शर्ट वजा डगला आणि खाली विविध डाग लागलेली मळखाऊ पैंट. ऑफिसच्या जिन्या खालीच एका टेबलावर हा गेली कित्येक वर्ष चहाचा धंदा करतोय आणि आमची अमृततुल्य तृष्णा भागवतोय. रोज सकाळी डाव्या हातात चहाची किटली आणि उजव्या हातात काचेचे ग्लास घेऊन ही मूर्ती आमच्या दरवाज्यात हजर होते. मस्त आलं आणि पातीचहा घालून केलेल्या चहाचा सुवास याच्या येण्याची वर्दी देतो.
प्रत्येकाला चहा देत देत त्याच्या तोंडाची टकळी कायम चालू असते. सगळ्यांशीच त्याचे विशेष सख्य नसले तरी आमच्या दोन चार जणांच्या टेबला पाशी मात्र त्याचे गप्पांचे फड जमतात. त्याचे विशेष जिव्हाळ्याचे विषय म्हणजे राजकारण, सामान्य पब्लिक, टिव्ही वरच्या मालिका आणि क्रिकेट. त्याचे प्रवचन चालते आम्हाला दिलेला चहा संपे पर्यंतच ... एकदा का आमच्या हातातील कप रिते झाले कि बाबू "छोट्याश्या ब्रेक नंतर पुन्हा भेटू"म्हणून पसार होतो आणि परत कधी भेटला कि उरलेले प्रवचन पूर्ण करतो. ते जर केले नाही तर कदाचित रात्री झोप लागत नसावी किंवा दुसर्या दिवशी चहाची चव बिघडत असावी असा माझा दाट संशय आहे.
मला बरेच वेळा आश्चर्य वाटायचे कि हा साधा चहावाला एवढ्या वेगवेगळ्या विषयावर आपले मत समर्थपणे कसे मांडू शकतो. "काय नाय साहेब .... डोळे आणि कान उघडे ठेवले कि मुंबई मध्ये सगळ्या गोष्टी कळतात. शिक्षण धड झाले नाही .. मामा मुंबईला घेऊन आला. बघता बघता सगळ शिकवलं मुंबई ने". खरेच आहे त्याचे म्हणा. कित्येक प्रकारचे रंगाचे ढंगाचे लोकं त्याच्या इथे चहा प्यायला येत असतील आणि याला फुकटात बातमी पुरवत असतील याचा काही नेम नाही. आमच्या साठी मात्र त्याच्या अमृततुल्य चहा सोबत मिळणारे ज्ञानामृत सकाळी सकाळी आमची गात्रे जागृत करून जायची. अशीच ही बाबूची खुमासदार चहाट(वा)ळकी तुमच्यासाठी पण....
"अहो साहेब ... हे लोकं वेडे का खुळे?" बाबू कपा मध्ये चहा ओतत म्हणाला. "शिकले सवरलेले हे लोकं काय ना काय कुरापती उचकून काढतात आणि त्या आमच्या सारख्या चहावाल्याला उगीच त्रास देत राहतात"
"अरे देवा! आता तुझे टेबल उचलून नेले कि काय त्या अतिक्रमन विरोधी माणसांनी?" आमच्या ऑफिस बॉयचा उगीच खोचक प्रश्न.
"नाय रे गणेश, माझ्या टेबलाला हात नाय लावू देणार ... रीतसर पावती फाडतो मी आणि आपल्या बिल्डींगच्या आवारात असल्याने कुणाची पण हिम्मत नाय" बाबुला मध्येच कुणीतरी प्रश्न विचारला कि बाबूचे कान वाकडे होतात आणि त्याला बाबू त्याच्या मूड प्रमाणे किंवा प्रश्न विचारणार्याची पत बघून वाटेला लावतो.
(इथे आमच्या सारखा चहावाला म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून ती व्यक्ती म्हणजे साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आम्हांला गेल्या सहा महिन्यात कळायला लागले होते. त्यामुळे मी हा प्रश्न विचारण्याचे धाडस केले नाही. ज्या दिवशी मोदी निवडून आले त्या दिवशी बाबू ने आम्हां सगळ्यांना फुकट चहा पाजला होता तो किस्सा परत कधी तरी)
"अहो साहेब, आता मला सांगा तुमच्या ऑफिस मध्ये नवीन साहेब कश्या साठी येतो?? धंदा वाढवण्यासाठीच ना??? मग मुंबई चा विकास करण्यासाठी आमच्या चायवाल्याने जर कुणी साहेब आणायचे ठरवले तर यांच्या पोटात का दुखतंय?" बाबू माझ्या उत्तराची वाट बघत होता.
"अरे बाबू असे काय करतोस. उद्या तुझ्या घरात येऊन तुला कुणी शहाणपणा शिकवायला लागले तर चालेल का?? आता काही जणांना वाटते कि मुंबई महाराष्ट्रा पासून वेगळी करण्याचा दिल्लीश्वराचा डाव आहे त्याला कोण काय करणार? आणि या आधी देखील असे प्रयत्न झालेले आहेत मुंबई महाराष्ट्रा पासून वेगळी करण्याचे. शेवटी उठाव झाला, मराठी बांधवांचे रक्त सांडले आणि मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. शेवटी मराठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे ना?" चहाचा घुटका घेत घेत बाबूच्या तोंडून काहीतरी श्रवणीय ऐकायला मिळावे या उदात्त हेतूने मी माझ्या तोंडाची वाफ मोकळी केली.
"कसली हो मराठी अस्मिता??" बाबूच्या या पहिल्याच वाक्याने आजचे निरुपण एकदम झक्कास होणार याची खात्री दिली. "मराठी माणूस राहिलाय का या मुंबई मध्ये? सगळे पळाले विरार, डोंबिवली, बदलापूर सारख्या उपनगरांमध्ये. अहो इथे दोन मराठी माणसे देखील एकमेकांशी इंग्रजी किंवा बम्बैय्या हिंदी मध्ये बोलतात. आज कुठलाही मध्यमवर्गीय मराठी माणूस मुंबई मध्ये घर घेण्याचे स्वप्न देखील बघू शकत नाहीत. दुकानाच्या पाट्या मराठीत करा असा फतवा ठाकर्यांच्या राज ने काढला होता ... पण तेरड्याचे रंग तीन दिवस. त्याने पण पब्लीशिटी ष्टंट करून हवा तयार केली "राज"कारणाची. तो अगदी मराठी माणसाच्या भविष्यासाठी गळे काढत असला तरी सध्या त्याला विचारतेय कोण? आणि तसेही हे राजकारणी लोकं आपल्या सोयीचे बघतात."
बाबूची गाडी सुसाट सुटली होती आणि ती आता राजकारण नावाच्या स्टेशन वर बराच वेळ रेंगाळणार हे नक्की. ते ऐकण्या साठी अजून चार पाच कानाच्या जोड्या सरसावल्या. बाबूचे प्रवचन चालू असताना बाकी कुणी मध्ये बोलायचे नाही हा दंडकच असल्याने प्रत्येक जण आता ही प्रभृती काय सांगणार या आशेवर चहा चा आस्वाद घेत होती.
"राजकारणी लोकं पण मोठे बेरकी ... मुद्दा नसला कि असे काही ठेवणीतले विषय अस्मितेच्या नावाखाली भिजत ठेवायचे. अहो असे थोडीच एखादे शहर वेगळे करता येईल ??? काहीतरी कायदा असेलच ना? मुंबई म्हणजे भारताची आर्थिक राजधानी पण सगळी बकाल करून ठेवली या लोकांनी. येणारे परप्रांतीयांचे लोंढे, वाढणारी गर्दी याच्या कडे मतांच्या बेगमी करीता डोळेझाक करणारे राजकारणी. याच भस्मासुराचा व्यवस्थेवर पडणारा ताण आणि विस्कटलेली मुंबई ची घडी. खरे तर जे आज मराठी अस्मितेचा कैवार घेऊन नाचत आहेत त्यांचीच तर सत्ता आहे मुंबई वर गेली कित्येक वर्ष. मुंबई बद्दल बाहेरचा कुणी बोलायला लागला कि यांना आठवते मराठी अस्मिता, संयुक्त महाराष्ट्र, हुतात्मा दिवस पण मुंबई मधून मराठी टक्का घसरत असताना हेच राजकारणी कुठल्या श्रींच्या वाड्यावर लपून बसतात कोण जाणे." बाबूच्या वाणीतून अविरत शब्द गळत होते.
अर्थात खरच होतं त्याचे म्हणणे. पण कुणाला पडली आहे इथे? इथे कामकरी, कष्टकरी वर्गच जास्त. उपनगरातून मुंबई मध्ये यावे, ८-१० तास काम करावे आणि झोपायला आपल्या घरी जावे. कधी रिक्षा वाले छळतात तर कधी ऑटोवाले संप करतात. उपनगरीय रेल्वे वेळेत चालली अशी स्वप्न पडली तरी भीती वाटते गाडी चुकण्याची. कधी नळाला पाणी नाही तर कधी ४ - ४ तास वीज नाही. या सगळ्या भानगडीत मुंबईत मध्ये वावरत असतो तो अस्मिता पिचलेला मराठी माणूस....
कपातला चहा संपत आला तरी मनात बाबूच्या बोलण्याचे विचारचक्र सुरूच होते. जाता जाता बाबू म्हणाला "साहेब काय हरकत आहे .... अजून एक मोठा साहेब आला आणि त्यांनी काही सुधारणा केली तर? आणि आमच्या चायवाल्याने आधीच सांगितले आहे तो असे पर्यंत मुंबई महाराष्ट्रा पासून दूर करणार नाही मग कसली चिंता?"
(साप्ताहिक राजमत मध्ये पूर्व प्रकाशित)

No comments: