Friday, March 13, 2015

"मार्क्स"वादी जीवन

आपली शिक्षण संस्था म्हणजे एक कारखाना आहे कारखाना. मुल शाळा नामक चार भिंतीमध्ये आलं की सगळी यंत्रे फिरायला लागतात. आणि १०-१२ वर्षात पुस्तकी गिलावा लागलेला दगड बाहेर पडतो मग तो दगड बरेचदा आपल्या आजूबाजूचे ऐकून अजून एका कारखान्यात दाखल होतो. तिथे ५-७ वर्ष राबून "पदवी" नावाचे वेष्टन मिळते आणि त्या दगडाचा "पदवीधर" होतो. या दोन कारखान्यात फरक इतकाच की नंतरच्या कारखान्यात तुम्हांला आयुष्यभर कश्याप्रकारे पैसे मिळतील ते ठरवता येतं. उदा. पास्कलचा दाब पारेषणाचा नियम मी शाळेत कधीतरी शिकलो. तोच महाविद्यालयातही शिकलो. काय उपयोग आहे त्याचा व्यवहारात? आज फुग्याला पिन मारली तर फुगा आवाज होऊन फुटतो हे लहान पोराला देखील कळते. अनावश्यक प्रमेये, व्याख्या, अर्धवट इतिहास अश्या अनेक प्रकारच्या हालअपेष्टा या एका तपात सहन कराव्या लागतात. सहन का कराव्या लागतात कारण पर्याय नव्हता आणि परिस्थितीचे अनुमान नव्हते, माहितीचा प्रसार झाला नव्हता. पुस्तकी ज्ञान भरपूर मिळाले पण प्रात्यक्षिक/प्रायोगिक बाबतीच भोपळाच हाती आला.
आता ची स्थिती अशी नाही. माहिती तंत्रज्ञानाने बऱ्याच गोष्टी सहजसाध्य झाल्या आहेत. मुलांचा कल बघून आपणच त्यांना त्या बाबतीत प्रोत्साहन द्यायला हवे. सक्षम, स्वावलंबी आणि संस्कारी मुल असणे हे जास्त महत्वाचे आणि भविष्यात अधिक गरजेचे आहे. या धकाधकीच्या जगात भरारी मारण्यासाठी देवाने आपल्या मुलांना पंख दिलेले आहेतच. त्या पंखाना बळ द्या, किती उंच उडायचं, कुठे विश्रांती घ्यायची, कुठे आणि केंव्हा घरटे बांधायचे याची जाणीव द्या. पण हे करतानाच त्यांच्या पंखाना आपली पिसे चिकटवू नका. आपल्या पिढीत अजूनही आई वडिलांच्या मर्जीचा, सल्ल्याचा, मार्गदर्शनाचा विचार केला जातो. अपवाद बरेच आहेत आणि ते वाढत आहेत याची खंत पण आहे आणि त्यामुळेच पुढची पिढी आपल्याला जाब विचारू शकेल याची खात्री वाटते. "मला डॉक्टर व्हायचे होते पण तुम्हांला इंजिनियरींग आवडते म्हणून तुम्ही मला इंजिनियरिंग मध्ये करियर करायला लावून माझ्या जीवनाचे वाट्टोळे केलेत" हे ऐकण्याची वेळ उतार वयात आपल्या पिढीवर येऊ नये हीच इच्छा. माणूस पाच हजारात पण सुखी राहू शकतो आणि पन्नास हजार पण पुरत नाहीत त्यामुळे त्याला महत्व नाही. विद्या असेल तर लक्ष्मी झक मारत येईल असं म्हणताना विद्या म्हणजे फक्त अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा व्यवस्थापन हेच विषय नाहीत हे ध्यानात असावे. आपल्या मुलांना नुसतं "गुण"वान बनवण्यापेक्षा "प्रज्ञावंत" बनवण्याचा प्रयत्न करा.....मार्कांची रेस फक्त १२वी - १५वी पर्यंतच ...जिंदगीकी रेस बहुत दूर तक जाती है मेरे दोस्त.

No comments: