Wednesday, April 1, 2015

संधिसाधू राजकारणी

पाकिस्तानातील पेशावर येथे एका शाळेवर अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केला. या गोळीबाराने अनेक कोवळ्या मुलांचे प्राण घेतले, अनेक मुलांना जायबंदी केले. जि मुले वाचली त्यांच्या मनावर काय परिणाम झाला असेल याचा विचारच करवत नाही. प्रसार माध्यमांनी या बातमीचे हल्ले वाचकांवर सुरु केले. जगातील मान्यवर लोकांची टिप्पणी ते ट्वीप्पणी, निधर्मी ते स्वधर्मी लोकांच्या राग, लोभ, द्वेष, मत्सर आदी रसांनी ओतप्रोत वाहणारी मनोगते, शब्दबंबाळ रकाने यांचा भडीमार करण्याची ही आयती संधी सोडली नाही. कशी सोडणार? हेच तर ते विकतात. फेसबुक, Whatsapp सारख्या आभासी जगात तर दोन परस्पर विरोधी भावनांच्या, विचारांच्या, संवेदनांच्या नद्या अगदी दुथडी भरून वाहात होत्या .... त्यात एक "झाले ते अतिशय वाईट झाले. दहशतवादाचा समूळ नाश करायलाच हवा" आणि दुसरी याच्या विरोधी "अतिशय उत्तम झाले ... पाकिस्तान सारख्या देशात हे आज ना उद्या होणारच होते ... आमच्या इथे आतंक पसरवून लाडू वाटता, जल्लोष करता काय?" काही जण होते मध्येच गटांगळ्या खाणारे जे म्हणत होते कि "पाकिस्तान बद्दल झाले याचे काही वाटत नाही कारण आपला एक नंबरचा शत्रू आहे पण त्या बिचाऱ्या लहान मुलांना कशाला मारायचे." त्यामुळे जे झाले त्याच्या बद्दल सामान्य नागरिकांच्या मनामध्ये संभ्रमावस्था वाढवण्या साठी कारणीभूत ठरले फेसबुकी आभासी विश्व.
इतिहासातले दाखले देत आमच्या ऑफिस मध्ये चर्चेला उधाण आले होते. गट अर्थात वर नमूद केल्या प्रमाणे ३ .... जहाल, मवाळ आणि या दोन्ही मध्ये नसलेले.
मवाळ: "कुठलीही हिंसा वाईटच हो मग ती कुठे का केली असे ना? मानवता हाच सर्व श्रेष्ठ धर्म. आणि त्यांनी पण म्हटले आहेच कि अशी हिंसा इस्लाम ला मंजूर नाही म्हणून. अश्याच दहशतवादा मुळे आपले कित्ती नुकसान झाले आहे. सकाळी मुले शाळेत जातात आणि मग बातमी येते कि शाळेत दहशतवादी आले आणि त्यांनी हिंसा केली. काही माणुसकी नाहीच या दहशतवाद्यांना. इतक्या निरागस मुलांवर बंदुकीची नळी ठेवून तिचा चाप तरी कसा ओढता येतो? उगीच कुठल्याही धर्माला टार्गेट करून हे लोकं सगळ्यांनाच दहशतवादी म्हणून मोकळे होतात. याचा सगळ्यांनी निषेध केला पाहिजे आणि निष्पाप जीवांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी १ मिनिटाची शांतता पाळली पाहिजे किंवा कॅण्डल मार्च केला पाहिजे"
जहाल: "काही नाही ... मेणबत्त्या कसल्या लावताय? निषेध कसले नोंदवताय? त्या देशाची तीच लायकी आहे. आज पर्यंत आपल्या देशात घुसून आपल्या माणसांना मारल्यावर कधीच तुम्ही इतक्या सहिष्णू प्रतिक्रिया दिल्या नाहीत. तुम्ही काळे फोटो चढवता एक दिवसा पुरते किंवा मेणबत्ती लावून मोकळे होता. अल कायदा सारख्या सापाला आश्रय दिल्यावर एक ना एक दिवस तो पकड्याना चावणारच होता. आणि लहान मुलांचे म्हणाल तर ती मोठी झाल्यावर आपल्या विरूद्धच गरळ ओकणार ना? आणि तसेही त्यांच्या धर्माच्या कृपेने खोऱ्याने मुले असतात त्यांना."
मवाळ: "अरे रे ... किती निष्ठुर विचारांचे आहात ... बोलवते तरी कसे तुम्हाला हे सगळे? आम्ही शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवणार. आज ना उद्या त्या दहशतवाद्याना त्यांच्या कृत्याचा पश्चात्ताप होईलच."
जहाल: "काही पश्चात्ताप वगैरे होत नाही. याना लहानपणापासून जिहादाचेच शिक्षण दिलेले असते. यांच्या मदराश्यांमध्ये इतर शिक्षणापेक्षा हिंदू द्वेषाचे डोस पाजले जातात. नुसते निषेध पाळून यांना काही फरक पडणार नाही. सर्व शक्तीनिशी लष्करी कारवाई करून यांचे समूळ उच्चाटन करायला हवे. आज इस्त्रायल सारखा छोटासा देश या सगळ्यांना पुरून उरतो कारण त्या लोकांचा प्रखर राष्ट्रवाद आणि देशभक्ती. स्वराज्य आणि सुराज्य ची स्थापना करण्यासाठी शस्त्र हाती धरायची तयारी हवी मेणबत्त्या नाही."
या सगळ्या गोंधळात हरवलेला मी सकाळी आल्या आल्या बाबू चहावाल्याची आतुरतेने वाट बघत होतो. माझ्या मनातल्या या वैचारिक वादळावर त्याचे शब्द म्हणजे अक्सीर इलाज. पण हा पठ्ठा आज नेमका उशीर करत होता आणि मला परत त्या वर्तमानपत्रातील भूतकाळाच्या काळ्या सावल्यांकडे बघायची देखील इच्छा नव्हती. संगणक चालू करून कामाला सुरुवात केली खरी पण बाबूचा कटिंग चहा प्यायल्या शिवाय चालना मिळणे कठीण झाले होते. आजूबाजूच्या कोलाहलात देखील बाबूच्या चहाचा सुगंध लपून राहिला नाही. मनात म्हटले आला एकदाचा हा बाब्या. खरे तर तो माझ्या जागेवर येई पर्यंत धीर धरणे भाग होते.
तो आल्या आल्या चहा भरताना मी विचारले "काय रे बाबू ... आज उशीर केलास? मला वाटले तु पण निषेध नोंदवायला गेलास कि काय? किंवा मेणबत्ती घेऊन उभा राहिला आहेस कि काय?"
"काय बोलताय साहेब??? कसला निषेध?? कसली मेणबत्ती ??? ज़रा सकाळी दूध मिळायला उशीर झाला म्हणून तुम्हाला चहा द्यायला उशीर झाला. तुम्हाला काय वाटले त्या लोंढया मध्ये हा बाबू पण सामिल झाला की काय?" इति बाबू.
"हो मग ... तुला कधीच एवढा उशीर होत नाही आणि सध्या इतके वातावरण तापलेले आहे की काय विचारु नकोस. वर्त्तमान पत्राचे पाहिले पान वाचावेसेच वाटत नाही. गेले दोन तिन दिवस तर सारख्या त्या दहशतवाद्यांच्या आणि त्या पाकिस्तानच्या बातम्या रकाने च्या रकाने भरून वाहत आहेत".....
"अहो साहेब" माझे बोलणे मध्येच थांबवत बाबू म्हणाला आणि मी पण जरा सावरून बसलो. "सगळे वाहत्या गंगेत हात धुवून घेत आहेत ... भारतातले लोक किती सहिष्णु आहेत. पाकिस्तान सारख्या कट्टर जन्मजात शत्रु वर आलेल्या संकटाने इथे लोकांना किती मानसिक धक्का बसला आहे आणि किती दुःख झाले आहे. पाकिस्तान दहशतवादाला कधीच थारा देणार नाही असे बरेच काही बाहि लिहून आले असेल पण पाकिस्तानची भुमिका ही कधीच भारताच्या दृष्टीने चांगली राहिली नाहिये. अगदी इथे जेंव्हा धुमश्चक्री चालु होती तेंव्हा तिथे आनंदाच्या उकळ्या फूटत पण असतील आणि हे सुद्धा आपल्याला प्रसार माध्यमांनी रंगवुन सांगितले असेल तिथल्या मुठभर लोकांच्या प्रतिक्रिये वरुन. तिथल्या सामान्य माणसाला काय वाटते हे कायम गुलदसत्यात राहिले आहे. तिथल्या नागरिकाला भारतिया प्रमाणे स्वातंत्र्य नाही. आणि सहिष्णुता व्यक्त करणे हे आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिशय महत्वाचे पाऊल आहे."
(कमाल आहे याला अंतरराष्ट्रीय राजकारण कधी समजायला लागले? एका संभ्रमावस्थेतून दुसऱ्या संभ्रमावस्थेत मेंदुचे भ्रमण होत होते.)
"आमच्या चायवाल्याने देखील हेच केले. त्याच्या कडून उकळीची अपेक्षा असताना हा फुंकर मारून मोकळा झाला त्याच बरोबर जम्मू काश्मीर मधील जनतेचा रोष होणार नाही याची तजवीज करुन ठेवली. इतके वर्षानी तिथे होणाऱ्या निवडणुकी मध्ये भाजपाला काही आशा निर्माण झाली आहे ती हा अशीतशी फुकट जाऊ देईल होय?? पाकिस्तानशी बोलणी नाकारुन त्याने आधीच आपली चाल खेळला आहे. त्यात काश्मीर मधील पुराग्रस्त भागाला पूर्ण सहाय्य दिल्या मुळे तेथील जनतेला प्रथमच भाजपा बद्दल विश्वास निर्माण होतोय. अश्या वेळी आमचा हा बनिया उगीच तोंडाची वाफ घालवणार नाही."
(मनात विचार आला बापरे काय बडबडतो हा. कस्स कळते याला?? इतका सारासार विचार करण्याची कुवत आपल्यात का नाही.)
"आता इकडच्या लोकांचे म्हणाल तर स्वधर्मी आणि निधर्मी यांचा कलगी तुरा कायम बघायला मिळणार. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ... एक नसेल तर दुसऱ्याला किंमत नाही. तसे दोघेही आतातायीच ... एकाने बोंब मारायचा अवकाश दूसरा लगेच शिमगा करायला तैयार. कालांतराने दोघेही विसरून नविन संधी शोधत बसतात."
बाबू आता निर्वाणीचा टोला हाणणार हे माझ्या सकट त्याच्या इतर श्रोत्यांच्या ध्यानात आले होते.
"एक सांगा हे दोन्ही पक्ष आपल्या घरात म्हणजेच भारतात काही झाले तर कुठल्या बिळात लपून बसलेले असतात??? रोजच्या रोज होणारे स्त्रियां वरचे अत्याचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पैश्यांचे घोटाळे अश्या वेळेस यांचे वाग्बाण कसे काय निष्प्रभ होतात. नक्षलवादी जेंव्हा आपल्याच पोलिसदलाची कत्तल करतात, सिमेवरून शेजारी घुसखोरी करतात त्याच्या विरुद्ध साधा ब्र निघत नाही यांच्या तोंडातून. काहिनाही हे सगळे एकजात संधीसाधू आहेत. ज्यांना काही काम नाही तेच असे बेताल विषय घेऊन चघळत बसतात. आधीच्या मुद्द्यांचा चावून चावून चोथा झाला की आपली प्रसार माध्यमे आणि राजकारणी दूसरा विषय चघळायला देतात आणि यांचा रावंथ परत सुरु होतो. या पेक्षा आपण बरे आणि आपले काम बरे.... चहा घ्या ... थंड होईल.
खरच या बाकीच्या चालु असलेल्या वादापेक्षा बाबुचा तरतम विश्लेषक संवाद अधिक मोलाचा ... त्याच्या अमृततुल्य चहा प्रमाणेच.

No comments: